एकलव्याची गोष्ट....
- Get link
- X
- Other Apps
By
.
-
एकलव्याची गोष्ट....
एकलव्याची गोष्ट.... मी एकलव्य आषाढातील पौर्णिमेस 'गुरूपौर्णिमा' म्हणतात. गुरूंच्या आशीर्वादासाठी, त्यांच्या शिकवणीसाठी तसेच गुरूंच्या प्रति निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भगवान वेदव्यास हे फक्त प्रज्ञावान ऋषीच नसून एक महान वैज्ञानिक व महान शास्त्रज्ञ होते. आपल्या भारतवर्षामघ्ये 'नमोस्तुते व्यास विशालबुध्दे।' असे म्हणून, या दिवशी घरोघरी व्यासपूजा करतात. अशा व्यासांच्या असामान्य प्रतिभेने शब्दांकित झालेले महाभारत... असं म्हणतात की या जगात अशी कुठलीही घटना, कथा, वा वेदना नाही, जिचा उल्लेख महाभारतामध्ये झालेला नाही. वेदविद्या पारंगत महर्षी द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अतुलनीय ज्ञान आणि युध्दतंत्र याकरिता महर्षी द्रोणाचार्यांची ख्याती होती. एकलव्य हा एका आदिवासी पुत्र. द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या संपादन करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. एकलव्याच्या शब्दांत त्याची कैफियत पुढे मांडली आहे. मी एकलव्य... तो दिवस माझ्या हृदयावर कोरून ठेवला गेला आहे, ज्या दिवशी मी माझ्या गुरूंना प्रथम पाहिले. होय, गुरू द्रोणाचार्य. उत्कृष्ट शिक्षक,शस्त्रहाताळणीमध्ये निपुण, विशाल ज्ञान आणि विद्वत्ता यांचा जणू सागर. त्यांच्या चेह-यावरचं तेज तर सदैव मनाला टवटवी देणारं आहे. गुरूजी, मी सदैव तुमचा आहे. सदैव तुमचा राहीन. होय. मी भिल्लाचा पोर आहे. मला तुमच्या ऋचा ठाऊक नाहीत. ठाऊक आहे, वनात बागडणं. मनसोक्त गीते गाणं, पोहणं आणि त-हेत-हेची फळं औषधी यांचे जतन करणं... झाडांवर प्रेम करणं... माझं धनुष्य, बाण आणि बाणांचा भाता हाच एकमात्र माझा आग्रह/हट्ट, जिव्हाळा आणि ध्येय... हे असं नेहमीच घडतं. प्रस्थापितांचं संरक्षण. त्यांची कोडकौतुके पुरविली जाणं हा तर रिवाज आहे. पण मी देखील एक उत्तम धनुर्धारी आहे, माझेही काही हक्क आहेत. हे या राजकुमारांच्या मांदियाळीमध्ये कोण लक्षात ठेवणार? मला काय हवं होतं? फक्त विद्या हवी होती. तुमच्याचकडून मला धनुर्विद्या शिकायची होती. हीन कुळातील म्हणून तुम्ही माझा अव्हेर केलात. तुम्हाला अर्जुन फार प्रिय होता... तो दिवस माझ्या हृदयावर कोरून ठेवला गेला आहे, ज्या दिवशी धनुर्विद्या देण्याला तुम्ही नकार दिलात. मला रडता आलं असतं. राग धरता आला असता. चिडचिड करता आली असती. नाहीतरी अरण्यात राहणा-या मुलाचा दंगा म्हणून सोडून दिलं असतं सा-यांनीच माझं वागणं. पण मला सुचला एक सुंदर विचार. एक ठाम प्रकाश त्या विचाराबरोबर वाहात वाहात आला माझ्या मनात. नदीच्या झुळणुळणा-या पाण्यातून. वा-यांच्या तालातून आणि मनाच्या खोल आतल्या गाभ्यातून. विचार असा होता, की जर तुम्ही माझे आहात, जर मी तुम्हाला पाहू शकतो, अशी भावना करू शकतो की तुम्हीच मला सर्वोत्तम, उच्चतम धनुर्विद्या शिकवत आहात, तर ती शिकवणी किती आगळीवेगळी किती थोर असेल! तुमचे अस्तित्त्व माझ्या मनात कायम होते. निराश होणं कधी मंजूर नव्हतंच. हारही मानायची नव्हती. मग काय उठलो. जिद्द आशा यांच्या प्रवाहात अंगांग न्हाऊन काढलं. आणि पर्णकुटीपाशी आलो. तुमच्या व्यक्तित्त्वाचा एक एक पैलू आठवत राहीलो. ते पैलू मातीच्या मूर्तीमध्ये सामावून जावेत म्हणून घडत राहीलो. घडवत राहीलो... धनुष्य, प्रत्यंचा, बाण, माती, तुमची मूर्ती आणि स्वत:ला सुध्दा... मग हे रोजचंच झालं. गुरूदेव आपलं गुरूकुल म्हणजे ही पर्णकुटी. आणि मोकळं मैदान, जंगलं ही आपली पाठशाळा. सतत सराव. निधिध्यास. दिवस रात्र केलेलं चिंतन. नेमबाजी, उंचावरील वस्तूचा अचूक वेध घेणे. आकाशातून, चल असताना नेम साधणं, स्वप्नांच्या चांदण्यांनी डवरून जायचं माझं मन. सभोवतीचं आवार, तुमचा पुतळा आणि आसमंतात भरून येणारी रात्र. बस निघालो. करत राहीलो. चालत राहीलो... किती, कसा, कधी, काहीच कळलं नाही. मग मात्र एक दिवस 'माझा' आला. सारे विद्यार्थी, राजे रजवाडे, गुरूजन यांना थक्क करून टाकणारे धनुर्विद्येचं प्रदर्शन त्या दिवशी घडलं. ते मी करत होतो. आणि सारे तथाकथित निपुण लोक पाहात होते. ही करामत फक्त गुरूंचा आशीर्वादच करू शकतो, हे यांना कोण सांगणार? सातत्य, साधना आणि चिंतन यांची ती बीजे होती. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना, मी मागीतलाही नसताना एक दिवस 'माझा' आला. माझ्या जयकाराने व माझ्या नावाच्या उच्चाराने, कौतुकाने सारा आसमंत भरून गेला.तुम्ही आश्चर्यचकित होऊन विचारलंत मला, की कोणाकडे ही विद्या शिकलास? मी तुम्हाला आदराने वंदन केले. पर्णकुटीच्या मागील परसात घेऊन गेलो. तुम्ही पाहिलीत तिथे तुमचीच प्रतिमा. स्वत:च्याच पुतळयाकडे पाहून तुमच्या नयनांतून घळघळ अश्रू ओघळले. मला मुक्त कंठाने, मनापासून आशीर्वाद दिलात, तो दिवस माझा होता... नंतर मग काय झालं, कुणास ठाऊक? पण गुरूदक्षिणा द्यायची व मागायची वेळ आली. आणि मी तर सांगितलं की काहीही मागा. तुम्ही मात्र मागितलात, माझ्या उजव्या हाताचा अंगठा! तुम्हाला ठाऊक नाही असे नाही. अंगठयाशिवाय धनुर्धारी कसा काय सर्वश्रेष्ठ ठरणार. माझ्या खूप गोष्टी कानावर आल्या. अर्जुनाला कुणीही स्पर्धक राहू नये, तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी असावा, यासाठी तुम्ही असं केलंत... असेलही... पण खरं सांगतो गुरूदेव, मी लागलीच तुमची गुरूदक्षिणा दिली. तेंव्हा मी मोकळा झालो, आणि तुम्ही मात्र अडकलात. पाप-पुण्यांच्या दुष्टचक्रात. राजनीतीच्या अन्यायी सापळयांत. मला खरोखरी कींव वाटली तुमची. अन्याय नाही वाटला. गुरूंनी मागितलेल्या गोष्टीचा अन्याय वाटला, तर तो खरा शिष्य असतो का? तुम्ही मला धनुर्विद्या शिकविण्यास नकार दिलात, त्या दिवशी संताप वाटला. असं वाटलं, का मी हीन कुळातला आहे? पण जेंव्हा तुम्ही अंगठा मागितलात ना, तेंव्हा मला सामोरं आलंच नाही, कुठलंही द्वंद्व. कुठलेही प्रश्न. किंवा कुठल्याही समस्या. अहो,कारण सोपं आहे. आधी माझ्याकडे काहीच नव्हतं, देण्यासारखं, आणि आता इतकी पुण्याई गाठवली की, तुम्ही मागितलंत ते मी देऊ केलं. देऊ शकलो. माझ्याकडे देण्यासारखं काहीतरी होतं. आजही आहे... टाळून टळण्यातला शिष्य मी नाही. मला टाळलंत, पण शेवटी येणा-या पिढया जेंव्हा जेंव्हा एकलव्याचे नाव घेतील तेंव्हा तेंव्हा त्यांना गुरू द्रोणाचार्य जरूर आठवतील. आणि प्रत्येक धनुर्धा-याच्या अंगठयाने मीच पुढे चालवत राहीन, हा घेतलेला वसा. तुम्ही मला शुभाशिर्वाद द्या, गुरूदेव... 'महाभारतातील पात्रांचे एक वैशिष्टय म्हणजे, प्रत्येकाला अन्याय झेलावा लागला आहे. घरच्या गरिबीमुळे आपला मुलगा अश्वत्थामा याला पीठाचे पाणी दूध म्हणून गुरू द्रोण यांना पाजावे लागले. मनोमन अर्जुनाला वरूनही द्रौपदीला पाच पतींशी संसार करावा लागला आहे. यात कृष्ण आणि विदूर यांना मात्र कायम समतोल राखता आला... अन्यायाला हसत हसत सामोरा जाणारा आणि जीवनापेक्षाही भव्य असा एकलव्य आजही आपल्या स्मृतीमध्ये हुरूप उत्साह, कष्टांचा पायंडा आणि एक ठसठस बनून राहीला आहे. शब्दांकन- राही साईराम
- Get link
- X
- Other Apps