अ.जा / अ.ज वर्गातील मुले
अ.जा / अ.ज वर्गातील मुले
आपल्या देशात आदिवासी जाती अथवा जमाती म्हणून ओळखल्या जाणा-या नागरिकांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 9% इतके आहे. त्यांचा सामाजिक इतिहास, भाषा, उत्पादने आणि नागरी समाजाशी संबंध यांतील वैविध्य लक्षात घेत सुमारे 87 दशलक्ष नागरिक हे आदिवासी समाजाचे आहेत तर त्यापैकी विमुक्त आणि भटक्या जमातीतील नागरिकांची संख्या सुमारे 60 दशलक्ष इतकी आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थान आणि प. बंगाल या ९ राज्यांमध्ये, एकूण देशातील लोकसंख्येच्या 4/5 इतके आदिवासी नागरिक राहतात.
आदिवासी (अ.ज.) विद्यार्थ्याच्या शिक्षणाशी संबंधित महत्वपूर्ण बाबी
आदिवासी शिक्षणासाठी सरकारव्दारे केले जाणारे प्रयत्न
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रस्तावित व्यवधाने
आदिवासी (अ.ज.) विद्यार्थ्याच्या शिक्षणाशी संबंधित महत्वपूर्ण बाबी
- सुरूवातीच्या वर्षांमध्ये सूचना देण्याचे माध्यम म्हणून आदिवासी भाषेचा वापर करणे, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सोयीचे होईल.
- परिचयाच्या आणि स्थानिक माध्यमाचा वापर केल्यास बालकांना नव्या संकल्पना सुलभरित्या आणि चटकन आत्मसात होतात, हे बाल विकास आणि अध्यापनशास्त्रातील संशोधनातून सिध्द झाले आहे.
- शहरात राहणा-या शिक्षकांच्या तुलनेत आदिवासी भागातील शिक्षकांच्या अनुपस्थितीचे प्रमाण खूपच जास्त आहे.
- शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या परिचित विश्वाशी साधर्म्य दाखवणारा नसतो. परिणामी त्यांच्या गोंधळात भर पडते.
- त्याचप्रमाणे शिक्षक शाळेत उपस्थित असताना या विद्यार्थ्यासाठी विशेष अध्यापन पध्दती अवलंबण्याच्या दृष्टीने अनभिज्ञ असतात. त्यामुळे विद्यार्थ्याना स्वातंत्र्य आणि अध्यापनात लवचिकतेचा अभाव राहतो.
- आदिवासी पालकांच्या मुलाखती घेतल्या असता ते आपल्या मुलांच्या भवितव्याबाबत सजग वाटले आणि त्यांनी मुलांच्या शिक्षणाला पूर्ण पाठिंबा दर्शवला. मात्र त्यांना सुशिक्षित करण्याच्या प्रयत्नात समाजाचा अधिक व्यापक सहभाग अपेक्षित आहे.
- आदिवासी समाजामध्ये आदिवासी मुली हा सर्वात दुर्लक्षित घटक असून, त्यांना शिक्षण दिले जाण्याचे प्रमाणही कमी आहे. 7 ते 14 वयोगटातील 26% मुलींच्या तुलनेत खालच्या जाती आणि आदिवासी समाजातल्या 37% मुली शाळेत जात नाहीत. (ल्युईस आणि लौकहीड 2007)
- आर्थिक आणि सामाजिक मर्यादांमुळे अनेक आदिवासी जमातीमधील पालक मुलींच्या शिक्षणाला फारसे महत्व देत नाहीत. त्यांना केवळ प्रारंभिक शिक्षण दिले जाते आणि बाहेरच्या जगापासून सुरक्षित ठेवले जाते. बहुतेकदा या मुली शेतीची कामे करतात, वनातल्या वस्तु जमा करतात आणि भावंडांची काळजी घेतात.
आदिवासी शिक्षणासाठी सरकारव्दारे केले जाणारे प्रयत्न
- गोंड, मावची, भील, पावरा अशा आदिवासी भाषांतील शब्दकोषांची निर्मिती
- सेतू साहित्य म्हणून धुळे जिल्ह्याची निर्मिती
- जुन्या अभ्यासक्रमानुसार व्दिभाषी पुस्तके तयार
- पाठ्यपुस्तकांमध्ये आदिवासी संस्कृती आणि चालीरितींचा अंतर्भाव असणा-या धड्यांचा समावेश
- प्रत्येक शाळेसाठी शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना
- लोकचेतना समाज प्रशिक्षणांतर्गत शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांचे प्रशिक्षण
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रस्तावित व्यवधाने
- सर्व मुख्य आदिवासी भाषांचे शब्दकोष तयार करणे (सुमारे 11)
- किमान इयत्ता पहिली ते चौथीसाठी व्दिभाषी पाठ्यपुस्तके तयार करणे
- आदिवासी संस्कृती आणि भाषा याबाबत अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी TRT, पुणे आणि वाचा यांच्याशी संपर्क साधणे
- आदिवासी नसणा-या शिक्षकांसाठी भाषा प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करणे.
- लोककथा, गाणी, म्हणी, कोडी अशा स्थानिक संस्कृतीमधील भाषा संबंधातील बाबींचा वापर करून अध्ययन – अध्यापन साधने तयार करणे.
- संदर्भिय अध्ययन साहित्याची निर्मिती.
- आदिवासी शब्दसंपदा आणि वर्णाक्षरे यांचा देवनागरी लिपीशी ताळमेळ साधणे.
- आदिवासीच्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्र्वभूमीबाबत माहिती देणारे साहित्य शिक्षकासाठी तयार करणे. शिक्षकांना स्थानिक भाषेची माहिती नाही, हे लक्षात घेत साधी, लहान वाक्ये आणि सोप्या भाषेचा वापर.
- आदिवासी विकास विभागाच्या साहाय्याने आदिवासी भागातील शिक्षकांसाठी विशेष वर्गांचे आयोजन
- आदिवासी भागातील शालेय व्यवस्थापन समितीसाठी विशेष प्रशिक्षण, मुलीच्या शिक्षणासंदर्भात लघु चित्रपटांची निर्मिती आणि त्यांचे नियोजनपूर्वक पध्दतशीर प्रसारण
- ‘दीपशाखा’ च्या धर्तीवर मुलींसाठी दैनंदिन आवश्यक बाबींसंदर्भातील प्रशिक्षण, किशोरी विकास योजना तथा ICDS नुसार तसेच आदिवासी भागातील शाळांतील मुलींसाठी जीवन शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवणे.