डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम-- उदात्त स्वप्ने पाहणारा दृष्टा...
भारतातील मिसाइल कार्यक्रमाचे जनक, आपली सुरक्षा आपणच करावी या कार्यक्रमाचे प्रेरणास्तोत्र असणारे. अग्नीच्या यशानं आपल्या देशाला अत्युच्च अशा परमानंदाच्या अवस्थेत पोहोचवनारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.. भारतातील सर्वोच्च नागरिक सन्मान प्राप्त करणारे आणि राष्ट्रपती पदापर्यंत पोहचणारे देशातील पहिले वैज्ञानिक... राजकारणापासून कोसो दूर असणारे व्यक्ती पण वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांची विस्मयकारक कामगिरी मुळे राष्ट्रपती पदाचे दरवाजे त्यांच्याकरिता खुले झाले होते. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या विशेष क्षेत्रात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करतो तेव्हा त्याच्याकरिता सगळ्या गोष्टी सहज शक्य होत जातात याच उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे अब्दुल कलाम…
विख्यात अणुशास्त्रज्ञ स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्राचे शिल्पकार, डीआरडीओ चे संचालक या नात्याने सर्वसामान्यांना सुपरिचित असणारे तसेच एक मनस्वी, वृक्षप्रेमी, पर्यावरणवादी.. जिवाभावाचे सख्य जोडणारा एक वडिलधारी... ज्याचे जे श्रेय ते त्याला जाहीरपणे देऊ करणारा दिलदार संघनायक... आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावून जाताना नोकरशाहीची कुंपणे ओलांडणारा मानवतावादी... कार्यशक्ती हा आपला गुण इतरांच्याही अंगी बाणावा यासाठी धडपडणारा हाडांचा शिक्षक अशा अनेक पैलूंनी साकारलेले बहुमुखी व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होत.
डॉ. अबुल फकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम हे त्यांचे पूर्ण नाव. बंगालच्या उपसागरातील एक बेट'रामेश्वरम्' तिथे एका नावाड्याच्या घरी जन्मलेले,त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरुंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआनण्याचा व्यवसाय करीत. या कुटूबांची रामेश्वर खुप श्रध्दा आहे म्हणूनच धर्माने मुसलमान असूनही त्यांच्या परिवाराला रामेश्वर येथील मंदिरात विशेष सम्मान मिळला आहे. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेज, तिरूची मधून बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. संस्थेतून एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी संपर्कात आले.
लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने त्यांनी बालपणातील बहुतांशी काळ आर्थिक समस्यांना तोंड देण्यात घालवला. अगदी लहान वयापासूनच त्यांनी कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी पूरक म्हणून गावात वर्तमानपत्रे विकणे तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. पुढे प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले, अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी त्यांना मिळाली. मुळातच चाणाक्ष, अभ्यासू व परिश्रमाची सवय असणाऱ्या डॉ. कलाम यांनी अल्पावधीतच या विषयातील तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यानंतर प्रशिक्षणासाठी ते पुन्हा कधीही परदेशी गेले नाहीत.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. १९६२ भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी, बंगलोरस्थित च्या कार्यक्रमात एरोडायनॅमिक्स डिझाइन, फायबर रिईन्फोर्सड प्लास्टिक या प्रकल्पात सहभागी. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही संशोधन मध्ये कार्य केले. सॅटेलाईट लॉंच व्हेईकल ३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे त्यांनी सार्थ करून दाखविले. नंतर 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार,डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.रणगाडा व लाइट काफॅंबॅं एअरक्राफट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. १९७९ ते ८० थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्ट केले.
एसएलव्ही कार्यक्रमानंतर कलामांनी एकात्म क्षेपणास्त्र प्रकल्पांतर्गत १९८५ साली त्रिशुल या अग्नीबाणाची निर्मिती आणि १९८८ मध्ये रिसर्च सेंटर इमारतीची निर्मिती आणि पृथ्वी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. आणि कोणत्याही परकीय मदतीशिवाय आपण आपल्या देशात इतक्या प्रगत तंत्रज्ञानाचा विकास करून ते उपयोगात आणू शकतो हे सर्वांना दाखून दिले. १९८९ साली अग्नी आणि १९९० साली आकाश व नाग या अग्नीबाणाची निर्मिती करण्यात आली. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. १९९१ मध्ये वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी.आर.डी.ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.रणगाडा व लाइट काफॅंबॅं एअरक्राफट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वैयक्तिक कामपेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. १९९० च्या प्रजासत्ताक दिनी त्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं. प्रा. विक्रम साराभाई यांनी वीस वर्षांपूर्वी बीजारोपण केलेल्या वृक्षाचं फळ पिकलं होत.
विज्ञानाचापरमभोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खुप संवेदनशील, अतिशय नम्र, प्रेमळ, साधे व सरळ आहेत. त्यांना वीणा वाजण्याचा, कविता करण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. निर्भयपणे जगाला सामोरे जाणारे कलाम कुरान आणि गीता दोन्हीला समान मानणारे आहेत. म्हणूनच आज सर्व धर्म,जाती संप्रदयातील लोकांना आपलेसे वाटतात. धर्म केवळ साधन आहे, अंतिम सत्याकडे जाण्याचा तो एक पूल आहे, अंतिम साध्य नव्हे. सत्य हे तर त्याहून खूप उंच आहे. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य या तत्त्वावर आधारलेले आहे. ‘सर्वधर्मसमभावी’ या शब्दाचे खऱ्या अर्थाने अब्दुल कलाम हकदार आहेत.
अब्दुल कलाम यांची काम करण्याची ताकद अफाट आहे. कामाबद्दलची निष्ठा आणि देशाप्रतीचा समर्पित भाव त्यांना थकू देत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वातून सकारात्मक उर्जेचा स्तोत्र सतत उसळत असतो. आपल्या देशातील तरुणाईने देशाची प्रगती साधण्यासाठी भव्य कार्ये डोळ्यांसमोर ठेवून ती पूर्ण करण्यासाठी झटावे आणि देशाचे चित्र बदलावे असे त्यांना वाटते. मुले देशाचे भवितव्य घडवू शकतात, त्यांची मने प्रेरित करूनच आपल्याला विकसित भारताचे स्वप्न साकार करता येईल,असे त्यांचे म्हणणे आहे.
२५ जुलै२००२ ला कलाम यांनी एका दिमाखदार वेगळ्या अशा सोहळ्यात राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. “स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा. संकुचित ध्येय बाळगु नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.”असे त्यांचे मनापासून सांगणे आहे आणि युवकांना दिलेले हा महान संदेश आहे. २५ जुलै २००७ रोजी ते राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले. आजपर्यंत कलाम यांना असंख्य पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. विविध विद्यापीठांनी‘डी.लिट’ हि सन्माननीय पदवी बहाल केली आहे. आर्यभट्ट पुरस्कार, नेहरू पुरस्कार, जी.एम. मोदी पुरस्कार, ओमप्रकाश भसीन पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार हे त्यांना मिळालेल्या पुरस्कारांपैकी काही आहेत.
अब्दुल कलाम यांना भारत सरकारने १९८१ साली'पद्मभुषण', १९९० साली 'पद्मविभुषण' तर १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन सन्मानित करण्यात आले. देशाला भरीव असे मार्गदर्शन करताना या थोर सुपुत्राला ‘भारतरत्न’बहाल करणे हा खरे तर त्या पुरस्काराचाच गौरव होय.
आयुष्यात भेटलेल्या मोठ्या व्यक्तींकडून शिकत ते स्वतः त्यांच्या पंगतीत जाऊन पोचले आणि देशाच्या उभारणीला त्यांनी हातभार लावला. चमत्कारिक प्रतीभाचे धनी असलेले अब्दुल कलाम आजच्या आणि येणाऱ्या पिठीकारिता प्रेरणा देणारे एक महान आदर्श आहेत.