शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकार व माहिती
1. शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकार कोणते ?
एकंदरीत निवृत्तीवेतनाचे आठ प्रकार आहेत. नियत वयोमान निवृत्तीवेतन, पूर्णसेवा निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, भरपाई निवृत्तीवेतन, जखम किंवा इजा निवृत्तीवेतन, अनुकंपा निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन असे हे प्रकार आहेत. नियत वयोमानानुसार म्हणजे वयाची 58 वर्ष पुर्ण झाल्यावर व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयाची 60 वर्ष पुर्ण झाल्यावर कर्मचारी निवृत्त होतो. स्वेच्छा निवृत्ती, रूग्णता आणि भरपाई हेही निवृत्तीचे प्रकार आहेत. अकार्यक्षमतेमुळे देण्यात येणारी निवृत्ती म्हणजे अनुकंपा निवृत्ती होय. निवृत्ती वेतन घेणारा जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याच्या कुटूंबियांना मिळते ते कुटूंब निवृत्ती वेतन. एखादा सरकारी कर्मचारी हरवल्यास त्याच्या कुटूंबियांना त्रास होवू नये म्हणून असाधारण कुटूंब निवृत्ती दिल्या जाते.
2. निवृत्ती वेतन कोणाला देय आहे ?
सेवानिवृत्ती वेतनासाठी कमीत कमी 10 वर्ष कालावधी हिशेबात घेतला जातो. आता 10 वर्ष सेवा झाल्यानंतर शेवटच्या वेतनावर पुर्ण निवृत्ती वेतन दिले जाते. ज्या कर्मचाऱ्यांची अर्हताकारी सेवा 10 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना निवृत्तीवेतनाऐवजी सेवा उपदान दिले जाते. सेवेच्या पुर्ण केलेल्या प्रत्येक सहामाहीसाठी अर्ध्या महिन्याचे वेतन असे उपदानाचे स्वरूप असते.
3. निवृत्तीवेतनाची परिगणना कशी केली जाते ?
निवृत्ती वेतनाची परिगणना ही निवृत्तीपुर्वी शेवटच्या 10 महिन्यात घेतलेल्या वेतनाच्या सरासरीवर किंवा कर्मचारी ज्या पदावरून सेवानिवृत्त झाला आहे त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेल्या मुळ वेतनाच्या 50% दराने यापैकी जे फायदेशीर असेल ते निवृत्ती वेतन देय असते.
4. कुटूंब निवृत्तीवेतन म्हणजे काय व ते कोणाला मिळते ?
कुटूंब निवृत्तीवेतन हे दोन प्रकारे मिळते. सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास आणि निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यू झाल्यानंतर. कुटूंब निवृत्तीवेतन हे कर्मचाऱ्याच्या पत्नी किंवा पतीस देण्यात येते. परंतू कर्मचाऱ्याची पत्नी/ पती हयात नसल्यास हे वेतन त्याच्या वारसदाराला देण्यात येते. मुलाला 21 वर्ष व मुलीला 24 वर्ष वय होईपर्यंत हे वेतन देता येते. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे अपत्य 100 % विकलांग असल्यास त्याला कुटूंब निवृत्तीवेतन तहहयात मिळू शकते.
5. सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास देय कुटूंब निवृत्तीवेतनाबाबतची माहिती सांगा ?
जर एक वर्ष सलग सेवा झाल्यानंतर सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटूंब निवृत्ती वेतन देय होते. एक वर्ष सलग सेवा होण्यापुर्वी मृत्यू झाला असेल व अशा कर्मचाऱ्याची सेवेत नेमणुक होण्यापुर्वी वैद्यकीय तपासणी झाली असेल तर त्यांच्या कुटूंबीयांना कुटूंब निवृत्ती वेतन देण्यात येते.
6. सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटूंब निवृत्तीवेतनाची परिगणना कशी करण्यात येते?
सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास
सेवा कालावधी
कुटुंब निवृत्तीवेतन दर / प्रमाण
मिळण्याचा कालावधी
७ वर्षापेक्षा कमी
मुळ दर = (अंतिम वेतन+ ग्रेड पे ) x 30%
तहहयात किंवा पात्र असे पर्यंत
७ वर्षापेक्षा अधिक
A) 1.01.2006 नंतर कर्मचाऱ्यास मृत्यु आला असेल तर मृत्युच्या दुसऱ्या दिवसापासून १० वर्षार्यंत मुळ दराच्या दुप्पट किंवा अंतिम वेतनाच ५०% यात जी कमी असेल ती रक्कम व त्यानंतर मुळ दराने ( अंतिम वेतन + ग्रेड पे x 30% ) हयात किंवा पात्र असेल तोपर्यंत
B) 01.01.2006 पुर्वी जर मृत्यु आला असेल तर कर्मचाऱ्याच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत किंवा 7वर्षापर्यंत जे अगोदर असेल तो पर्यंत मुळ दराच्या दुप्पट किंवा अंतिम वेतनाच ५०% यात जी कमी असेल ती रक्कम व त्यानंतर मुळ दराने ( अंतिम वेतन + ग्रेड पे x 30% ) हयात किंवा पात्र असेल तोपर्यंत
7. निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यु झाल्यास कुटूंब निवृत्तीवेतनाची परिगणना कशी करण्यात येते ?
निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यु झाल्यानंतर:-
एखादा निवृत्तीवेतन धारक निवृत्ती वेतन घेत असताना मुत्यु पावल्यास त्याच्या कुटूंबियांना निवृत्तीवेतन दिले जाते.
मृत्यु वेळचे वय
कुटुंब निवृत्तीवेतन दर
मिळण्याचा कालावधी
६५ वर्षानंतर मृत्यु
मुळ दराने (अंतिम वेतन ग्रेड पे) x 30%
तहहयात किंवा पात्र असेपर्यंत
६५ वर्षाच्या आत
मुळ दराच्या दुप्पट किंवा अंतिम वेतनाच्या ५०% किंवा तो घेत असलेले निवृत्तीवेतन यापैकी कमी असेल ती रक्कम.
मृत्युनंतर ७ वर्ष किंवा निवृत्तीवेतन धारकांच्या वयाची ६५ वर्ष पुर्ण झाली असेल अशी तारीख यातील अगोदरची असेल त्या तारखेपर्यंत व त्यानंतर मुळ दराने तह हयात किंवा पात्र असेपर्यंत.
8. शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळेस निवृत्तीवेतनाव्यतिरिक्त इतर कोणते लाभ मिळतात ?
दहा वर्ष सेवेनंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाशिवाय सेवा उपदानही मिळते. त्यांची गणना 1/4 गुणिले (वेतन अधिक ग्रेड पे) अधिक सेवेचा सहामाही कालावधी किंवा वेतन अधिक ग्रेड पे अधिक 16.5 किंवा रू. 7,00,000/- यापैकी जी कमी रक्कम असेल ती मिळेल.
9. शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना सेवा उपदान मिळते का?
शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना ही सेवा उपदान मिळते.
मृत्यू उपदानाची परिगणना
अ.क्र
अर्हताकारी सेवेचा कालावधी
मृत्यु उपदानाचा दर
१
एक वर्षापेक्षा कमी
वेतन * ग्रेड पे * २
२
एक वर्ष किंवा जास्त परंतु पाच वर्षापेक्षा कमी
वेतन * ग्रेड पे * ६
३
पाच वर्ष किंवा जास्त पंरतु वीस वर्षापेक्षा कमी
वेतन * ग्रेड पे * १२
४
वीस वर्ष किंवा त्याहुन जास्त
१/२ *वेतन * ग्रेड पे *सहामाही कालावधी (वेतन* ग्रेड पे *अहर्ताकारी सेवा) किंवा वेतन * ग्रेड पे *३३ किंवा सात लाख यापैकी जी कमी एकुण असेल ती रक्कम.
10. शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त होताना पेंशन विकतो म्हणजे काय ?
कर्मचाऱ्याला जी पेंशन मिळते त्यातून 40 % तो शासनाला विकू शकतो. 15 वर्षानंतर ती परत जमा होते. आणि जर त्या पेंशन धारकाचा मृत्यु झाला तर त्याच्या वारसांना जे कुटूंब निवृत्ती वेतन मिळते त्यात हा भाग न वगळता त्यांना पुर्ण वेतन मिळते.
11. सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतन वेळेत मिळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
कर्मचाऱ्याने सेवा निवृत्ती होण्याच्या दोन वर्ष अगोदर निवृत्ती वेतन प्रकरण सुरू करायला पाहिजे. वेतन पडताळणी आवश्यक असते. त्यानंतर कार्यालयातर्फे एक सेवा निवृत्ती आदेश काढला जातो. गेल्या पाच वर्षात ज्या-ज्या ठिकाणी तो काम करत होता. त्या ठिकाणाहून ना देय प्रमाणपत्र घ्यावयाचे असतात. त्याच्यावर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र घ्यावे. सहा महिन्याअगोदर ही सर्व प्रकरणे महालेखापालाकडे सुपुर्द करावे. त्यामुळे निवृत्त झालेल्या दिवशी निवृत्ती वेतन विना विलंब मिळते.
12. वेतन पडताळणी म्हणजे काय ? वेतन पडताळणी करतांना कोणत्या बाबी तपासल्या जातात ?
प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1980 मधील तरतुदीनुसार प्रत्येक कार्यालयाने तयार करावयाचे असते. सेवा पुस्तकात कर्मचाऱ्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून ते निवृत्तीच्या दिनांकापर्यंत सर्व नोंदी विशेष करून वेतनाबाबतच्या नोंदी नमूद करावयाच्या असतात. या सर्व नोंदी अचूक नियमानुसार आहेत का हे पडताळणे आवश्यक असते त्यास वेतन पडताळणी म्हणतात.
वेतन पडताळणी करतांना पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी, नाव बदलाची नोंद, वार्षिक वेतनवाढ नोंद मानवी दिनांक/ वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी, हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद, पदोन्नती/ आश्वासित प्रगती योजना एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद, बदली/ पदोन्नती/ अन्य नियुक्ती आदेशाची नोंद, बदली/ पदोन्नती/ अन्य नियुक्तीनुसार कार्यमुक्त/ हजर/ पदग्रहण अवधी नोंद व इतर.
13. हयातीचा दाखला म्हणजे काय ? तो कसा सादर करावा ?
निवृत्ती वेतन धारकाला हयातीचा दाखला वर्षातून एकदा नोव्हेंबर महिन्यात जिल्हा कोषागार कार्यालयास सादर करावा लागतो. हयातीचा दाखला प्राप्त झाला नाही तर, निवृत्ती वेतन बंद करण्यात येते. या वर्षी 15 जानेवारी पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.
हयातीचा दाखला व्यक्तीगतरित्या जिल्हा कोषागरात पोस्टाद्वारे किंवा विविध बँकामध्ये व्यक्तीगतरित्या हजर राहून सादर करावा लागतो. पोलिसस्टेशनचा फौजदार किंवा ग्रामपंचायतीचे अधिकारी, दंडाधिकाऱ्यामार्फत देऊ शकतो.
14. वेतन पडताळणी बाबत संगणकीय प्रणाली विकसित केली आहे का ?
जीवन प्रमाण प्रणाली या वर्षी विकसीत करण्यात आली आहे. त्यामुळे घरात बसून बायोमॅट्रिक डिव्हायसेसद्वारे पाठवू शकतो. www.jivanpraman.gov.in वर आपण जाऊ शकतो. www.mahakosh.in या वेबसाइटवर वेतन पडताळणी साठी वेतनिका म्हणून आहे त्या वेतनिकेवरती कर्मचारी व कार्यालयाला कोणते सेवा पुस्तक तपासून झाले कोणते नाही याची माहिती तसेच पुढच्या वर्षी कोण निवृत्त होणार याची माहिती मिळते.
15. Digital Life Certificate म्हणजे काय ?
केंद्र शासनाचे असे धोरण आहे की, सर्व शासकीय सोयी-सुविधा ह्या भारतीय नागरिकाला सहजगत्या उपलब्ध व्हाव्यात. डिजीटल इंडिया अन्वये निवृत्तीवेतन धारकांनाही हयातीचा दाखला डिजीटल पद्धतीने सादर करता यावा म्हणून महाराष्ट्र शासनाने हयातीचा दाखला सादर करण्यासाठी ही एक अतिरिक्त सुविधा उपलब्ध केली आहे. Digital Life Certificate साठी निवृत्तीवेतनधारकाचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.
16. निवृत्तीवेतनधारक Digital Life Certificate कशा पद्धतीने सादर करु शकतो ?
निवृत्तीवेतनधारक हा स्वत:च्या एन्ड्रायड मोबाईलवरुन/ वैयक्तिक विंडोज संगणकावरुन बायोमॅट्रीक डिव्हायसेसच्या आधारे (Finger Print किंवा आयरिस संयंत्रे) किंवा Citizen Service Center/ NIELIT (National Institute of Electronics and Information Technology च्या Center मधून तसेच जिल्हा कोषागराद्वारे, उपकोषागाराद्वारे विविध बँकाद्वारे, सेतू/ महा-ई सेवा केंद्राद्वारे Digital Life Certificate सादर करु शकतो.
17. Digital Life Certificate सादर करण्यासाठी कोणती कार्यप्रणाली वापरण्यात येते ?
एन्ड्रायड मोबाईल व वैयक्तिक विंडोज संगणकावर ही प्रणाली www.jeevanpraman.gov.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावयाची आहे. त्यानंतर त्याच्यावर ई-मेलची नोंद करुन घेऊन त्यावर I Agree या बटणावर क्लीक करावे सदर प्रणाली 64 बीट व 32 बीट दोन्हींसाठी उपलब्ध आहे. Digital Life Certificate सादर करताना निवृत्तीवेतन धारक ज्या कोषागारातून निवृत्तीवेतन घेत आहे ते कोषागार निवडावे, स्वत:चे संपूर्ण नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक, बँक खाते क्रमांक इत्यादी माहिती भरावयाची आहे. Finger Print आणि आयरिस स्कॅनरद्वारे बायोमॅट्रीक ऑथॅन्टीकेशन करुन स्वताला रजिस्टर करुन घेण्यात यावे. त्यानुसार निवृत्तीवेतनधारक स्वत:च्या निवासस्थानातून बायोमॅट्रीक ऑथॅन्टीकेशन स्वत: करु शकतील व जीवन प्रमाण पत्र कोषागारास सादर करु शकतील. प्रणालीचा वापर केल्यावर निवृत्तीवेतन धारकाला तात्पुरते Digital Life Certificate मिळते. त्यावर संबंधीत कोषागार कार्यालय ते प्रमाणपत्र मान्य किंवा अक्षेपीत करते. सदर बाबतचा SMS निवृत्तीवेतनधारकाला प्राप्त होईल. तसेच निवृत्तीवेतन धारक जीवनप्रमाण प्रणालीवर जाऊनही आपल्या Digital Life Certificate बाबतची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतो. त्यासाठी त्याला जीवन प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यावर निवृत्तीवेतनधारक/ कुटूंब निवृत्तीवेतनधारक यांनी जीवन प्रमाण संकेतस्थळावर Pensioner Sign in वर जीवनप्रमाण ID किंवा आधार कार्ड क्रमांक नोंदवून माहिती प्राप्त करुन घेऊ शकतो. अधिक माहिसाठी जीवनप्रमाण प्रणालीमध्ये डाऊनलोड या बटणावरती क्लिक केले असता माहिती डाऊनलोड होते. निवृत्तीवेतन धारकाच्या जवळ असलेले Citizen Service Center/ NIELIT Center ची यादी जीवनप्रमाण पोर्टलवर उपलब्ध आहे.
18. वेतन पडताळणी बाबत मोबाईल ॲप आहे काय ?
वेतन पडताळणी बाबतची माहिती मोबाईलद्वारे मिळण्यासाठी मोबाईल ॲप विकसीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
19. भारताचा निवासी नसेल अशा निवृत्तीवेतन धारकाने काय करावे ?
अशा निवृत्तीवेतन धारकाने तिथल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्यावी किंवा तिथला जो दंडाधिकारी आहे किंवा लेखाप्रमाणक यांची सही घेवून हयातीचा दाखला सादर करावा.